कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील काही तालुक्यांच्या सरपंच निवडी पार पडल्या. पण सरपंचपदाच्या आरक्षणावरून वादग्रस्त झालेल्या पाच तालुक्यातील सरपंच निवडीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्णय घेऊन आता याप्रकरणी गेल्या पाच तालुक्यातील २३६ गावच्या सरपंच निवडीची तारीख २५ फेब्रुवारी निश्चित केली आहे.

भुदरगड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा यामध्ये समावेश असून या तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे २२ फेब्रुवारी रोजी फेर आरक्षण करून त्यानंतर त्याची तारीख जाहीर करणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी करवीर ५४, शाहूवाडी ४१, शिरोळ ३३, गडहिंग्लज ५०, पन्हाळा ४२, भुदरगड १६ अशा २३६ ग्रामपंचायतीची सरपंच निवडीसाठी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.