शिये पूरग्रस्तांच्या पुनर्वसनात खो घालणार्‍या संघटनेला जशास तसे उत्तर देऊ…

सरपंच, उपसरपंचांचा इशारा  

0
392

टोप (प्रतिनिधी) : शिये पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत जिल्हा प्रशासन, महसूल, ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्यांना अडचणीत आणून चांगल्या कामांना खो घालण्याचा प्रयत्न थांबवावा. अन्यथा, रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटनेला जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा सरपंच रेखा जाधव आणि उपसरपंच शिवाजी गाडवे यांनी संघटनेचे नाव न घेता पत्रकार परिषदेत दिला.

शिये गावातील पुनर्वसन व अतिक्रमणाविषयी वारंवार शेतकरी संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने व आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिये ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच जाधव, उपसरपंच गाडवे, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव काशीद, जि. प. सदस्य बाजीराव पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील, जयसिंग पाटील यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण होण्यापूर्वी निदर्शनाचा इशारा देणाऱ्या संघटनेचा निषेध केला.

उपसरपंच शिवाजी गाडवे म्हणाले की, महापुरामध्ये ७७३ कुटुंबांना स्थलांतर व्हावे लागले १९८९, २०१९ प्रमाणे यंदाही शिये गावभाग पाण्याखाली गेला. यामुळे ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, सहायक कृषी अधिकारी यांनी महापुरात उत्कृष्ट काम केले. सर्व पंचनामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी शेतकरी संघटनेकडून प्रशासनाविरोधात आंदोलन करून अधिकाऱ्यांच्या निलंबन, बदनामी करण्याची मागणी करून पुनर्वसन प्रश्नी खो घालण्याचा प्रयत्न जर नाही थांबला तर जसेच्या तसे उत्तर दिले जाईल.

शिये गावातील अतिक्रमणे अनेक वर्षांपासून आहेत. शासन निर्णयानुसार नियमितीकरण करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र या संदर्भात कोर्टाच्या नोटिसा पाठवून तेही काम थांबवण्याचा प्रयत्न संघटनेच्यावतीने करण्यात येत असल्याचा आरोप माजी सरपंच रणजीत कदम व बाजीराव पाटील यांनी केला. ग्रा. पं. सदस्य कृष्णा चौगुले यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे सांगितले.

या वेळी जयसिंग काशीद, विकास चौगुले, विलास जाधव, प्रभाकर काशीद, बाबासाहेब बुवा, हंबीरराव कोळी, हनुमंत पाटील, सेवा संस्था संचालक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.