कागल (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने संकेश्वर ते बांदा या महामार्गास भारतमाता प्रोजेक्ट रूट -१ अंतर्गत मंजुरी दिली आहे. त्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन आभार मानले.

बेळगाव, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यातून जाणारा संकेश्वर ते बांदा रस्ता व्हावा, यासाठी आम्ही काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे दिलेल्या  प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. हा महामार्ग संकेश्वर  (एनएच ४८ जंक्शन) येथून चालू होऊन संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली, माडखोल, सावंतवाडी मार्गे बांदा येथे एनएच ६६ ला मिळणार आहे. अंदाजे १०३.६०० किलोमीटरचा हा ४ पदरी महामार्ग बेळगाव, सिंधुदुर्ग, व कोल्हापूर जिल्ह्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय कागल विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४२ खेडी दळणवळणाच्या दृष्टीने थेट संपर्कात येणार असून या महामार्गामुळे वाहतुकीचे प्रश्न सुरळीत लागण्यास मदत होणार आहे.