एकाच महिन्यात दोनवेळा ‘संकष्टी चतुर्थी’चा योग..!

0
101

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (३१ जानेवारी) आहे. जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. पहिली संकष्टी चतुर्थी २ जानेवारीला होती. तर दुसरी चतुर्थी आज ३१ जानेवारीला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी पर्वणी असणार आहे. सामान्यपणे संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेतात. तर काही जण या दिवशी उपवास ठेवतात.

कोरोना संकटामुळे अनेक महिने बंद असलेली मंदिरे योग्य ती खबरदारी घेत खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असणार आहे. दर महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी अशा दोन चतुर्थी येतात. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास दुपारच्या (मध्यान्ह) वेळी १२ वाजता सोडला जातो. पण संकष्टीचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. ३१ जानेवारीरोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे यावेळी पूजा करता येईल आणि चंद्रदर्शन घेता येईल.