मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांना पतंग उडवायचा,  त्यांनी उडवावा. कुणाचा पतंग कधी कापायचा,  हे आम्हाला समजते,  असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असून कधी विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसत नाही.  दिलेला शब्द मोडत नाही. हीच शिवसेनेची खासियत आहे,  असेही राऊत म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का?  अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  यावर राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या त्या विधानाचा खुलासा  केला आहे.

आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायची असेल तर त्यांनी जरूर उडवावी. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे.  मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केले आहे. त्यांनी असे कुठेही म्हटलेले नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितले  की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.