मुंबई (प्रतिनिधी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने २२ ऑगस्टपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्त्वाचे म्हणजे ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली.

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना औषधे आणि घरचे जेवण मिळावे, अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना संबंधित औषधे उपलब्ध करुन देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. न्यायालयाने संजय राऊत यांची वैयक्तिक बेडची मागणी फेटाळली आहे. जेल प्रशासनातर्फे उपलब्धतेनुसार बेड दिले जावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी मुख्य वैद्यकीय अधिकारीकडून करावी आणि तो अहवाल कोर्टात दाखल करावा असे निर्देश ही न्यायालयाने दिले आहेत. संजय राऊत यांना अॉर्थर रोड कारागृहात नेणार आहेत.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. ८ ऑगस्टपर्यंत ते ईडी कोठडीमध्ये होते. आज ईडीची कोठडी संपत असल्याने संजय राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आले होते. ईडीने त्यांची कोठडी न मागितल्याने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला. यानंतर आता संजय राऊतांचा जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय खुला झाला आहे.