मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ निर्माण झालेला आहे, असा टोला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्षपद भूषवायला पाहिजे, असे   संजय राऊत यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. यावर हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया देताना राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

दलवाई म्हणाले की, बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येत असतात. आत्ता त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावचट चर्चा करण्याची काय गरज आहे? अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना  भान ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.