कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपापला उमेदवार मागे घेण्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या खलबतानंतर ‘मविआ’ आणि ‘भाजप’ हे दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्याने आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आरपारची लढाई अटळ आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि माजी खा. धनंजय महाडिक या दोघांमधील सामना आता चुरशीचा होणार यात कसलाही संदेह नाही. अपक्ष व इतर आमदारांच्या पाठबळावर दिल्लीला कोण जाणार, हे आता दहा जूनला स्पष्ट होईल. दरम्यान, पडद्याआडून होणाऱ्या घोडेबाजारावर आणि महाविकास आघाडीतील एकोप्यावरच शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या विजयाचे भवितव्य अवलंबून आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा ते कमालीचे  आश्चर्यचकीत झाले. प्रसारमाध्यामातूनच आपल्याला उमेदवारी मिळाल्याचे समजल्याचे सांगून पवार यांनी मातोश्रीचा हा निर्णय म्हणजे आपल्या पक्षनिष्ठेची व कार्याची पोचपावती असल्याचे सांगितले. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा राजकारणात गेली ३५ वर्षे सक्रिय असणारे संजय पवार यांनी आजपर्यंत अनेकवेळा संघर्ष केला आहे. सामाजिक, राजकीय जीवनात त्यांनी विविध प्रकारे कार्य करून आपला ठसा उमटवला आहे. ज्वलंत प्रश्नावर झालेल्या विविध आंदोलनात हिरीरीने भाग घेऊन सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्यानेच संजय पवार यांनी सच्चा शिवसैनिक व राबणारा कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

आता राज्यसभेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक या कोल्हापुरातील दोन मल्लांमध्ये कमालीची चुरशीची लढत होणार असल्याने याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अलीकडेच झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजयासाठी शिवसेनेने फक्त मदतच केली नाही तर पूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त पुढाकार घेतल होता. कोल्हापूर उत्तरमधील यशामुळेच आता राज्यसभेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जर अधिक ताकद संजय पवार यांच्या पाठीशी उभी केली तर त्यांना ही निवडणूक फार अवघड जाणार नाही.

पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यातील कलह सर्वश्रुत आहे. महापालिका, गोकुळ, जिल्हा परिषदमध्ये सतेज पाटील व हसन मुश्रीफ या दोन मंत्र्यांनी आपले वर्चस्व ठेवले आहे. भाजपमुक्त कोल्हापूर करण्यात या दोघांची रणनीती खूपच मोलाची ठरली आहे. जर राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयी झाले तर ती सतेज पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी सतेज पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रातून मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षाची उर्वरित मते शिवसेनेला देण्याचे फर्मान काढले असले तरी ‘मविआ’मधील नाराज लोकप्रतिनिधींची भूमिका काय राहते, हे पाहावे लागेल.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली सर्व ताकद संजय पवार यांच्या बाजूने उभी केली तर त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. संजय पवार यांचा विजय झाल्यास आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा लाभ शिवसेनेला होण्यासाठी ते प्रयत्न करतील. एकप्रकारे शिवसेनेला बळ मिळणार आहे. अर्थात मनपा व जि.प. निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेचे संजय पवार यांचा राज्यसभेवरील विजय महत्त्वाचा वाटतो. त्याचबरोबर ‘मविआ’मध्ये एकोपा कितपत आहे यावरच संजय पवार यांचे दिल्लीला जाणे पक्के होणार आहे.

‘विजय मिळाला वा नाही मिळाला तरी या निवडणुकीसाठी माझ्या नावाची शिफारस मातोश्रीकडून झाल्याने मी धन्य पावलो’, ही संजय पवार यांची प्रतिक्रिया खूप बोलकी व लढतीतील आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे.