कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनीही परिश्रम घेतले. शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर हे आमदार झाले, याचा मला आनंद आहे. परंतु त्यांनी आम्हाला आभाराचा साधा एक फोनही केला नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज (शुक्रवार) महासैनिक दरबार हॉल येथे विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. भाषणानंतर संजय पवार यांनी कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले.

 

पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन आमदारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, ज्या भाजपने आमचा विश्वासघात केला त्यांच्याबरोबर आम्ही युती संपुष्टात आणली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले आहे. सर्व निवडणुका एकत्र लढविण्याचे ठरले आहे. त्यानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनीही परिश्रम घेतले. ना. मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम, तसेच तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे या उमेदवारांचा विजय झाला. ना. मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील हे मोठे नेते आहेतच. त्यामुळे त्यांना याचे श्रेय दिलेच पाहिजे, मात्र प्रा. आसगावकर यांनी आम्हाला साधा आभाराचा फोनही केला नाही, अशी नाराजी व्यक्त केली. भाषण पूर्ण होताच पवार हे कार्यक्रमातून तडक निघून गेले.

यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच वेळ काढून त्यांच्या संजय पवार यांच्या घरी जाऊन आभार व्यक्त करा आणि पेपरमध्ये जाहिरात देखील द्या, असे नूतन आमदार अरुण लाड आणि आसगावकर यांना सांगितले. असे जरी असले तरी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने जाहीर नाराजी व्यक्त केल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांत या प्रकाराची चर्चा सुरू आहे.