गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नदी घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून ७५ लाखांचा निधी देत असल्याची घोषणा खासदार संजय मंडलिक यांनी केली. गडहिंग्लज येथील पूरग्रस्तांना भेटी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी खासदार मंडलिक यांनी केली. यानंतर नगरपालिकेत झालेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार राजेश पाटील यांचीही उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार मंडलिक यांनी पुररेषेत कोणत्याही प्रकारची नव्याने बांधकामे होणार नाहीत याची काळजी नगरपालिकेने घ्यावी अशी सूचना मुख्याधिकाऱ्यांना केली. तसेच प्रशासनाने तात्काळ सुरू केलेल्या पूरग्रस्तांच्या पंचनाम्याबद्दल कौतुक करून सध्या पडझड न झालेल्या पण पुराच्या पाण्यामुळे ओल्या असलेल्या भिंतीची नंतरच्या काळात पडझड झाल्यास त्यांचाही समावेश पंचनाम्यात व्हावा अशी सूचना केली. महापुराचा धोका हा भविष्यात दरवर्षी उद्भवण्याची शक्यता असल्याने पुररेषेत असणाऱ्या कुटुंबांचे कायमचे पुनर्वसन होण्याबाबत शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही मंडलिक यांनी दिली.

याशिवाय जिल्ह्याचा विचार करता सुमारे १  हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज खासदार मंडलिक यांनी व्यक्त केला. सध्याची पूरस्थिती ही कोणत्याही धरणातील पाणीसाठ्यामुळे उद्भवली नसून याला राष्ट्रीय महामार्गाची उंची जबाबदार असल्याचे मत मंडलिक यांनी मांडले. यासाठी ब्रिटिश कालीन कमानी असणाऱ्या पुलाच्या धर्तीवर महामार्गावर अनेक ठिकाणी पूल बांधण्याची गरज व्यक्त करून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या नद्यांना संरक्षक कठडे बांधण्याच्या चर्चेत कोणतेही साध्य नसल्याचे सांगत कठडे बांधण्याला मर्यादा असल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, सुरेश कुराडे, रामगोंडा पाटील आदी उपस्थित होते.