कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेचा करनिरर्धाक संजय भोसले व त्यांच्या वकिलांनी पाठविलेल्या ५ कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या नोटीशीला मी दिलेले उत्तर स्वीकारलेले नाही. यावरून मी त्यांच्यावर घरफाळा घोटाळयाचे केलेले आरोप सिध्द होत आहेत,  असे ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत सांगितले. 

संजय भोसले यांनी मला त्यांचे वकील अॅड. एस.बी. नलवडे यांच्यामार्फत पाठविलेल्या ५ कोटी रूपयांच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याच्या भरपाईच्या नोटीशीला मी माझे वकील प्रल्हाद एम. पाटील यांच्यामार्फत जे उत्तर पाठविले होते. त्यांनी ते घेतलेले नाही. व त्यांनी ते परत पाठविले आहे. संजय भोसले ३ कोटींच्या घरफाळा घोटाळ्यामध्ये  दोषी असल्याचे मी वेळोवेळी कागदपत्री पुराव्यानीशी आरोप केले होते. यामध्ये संजय भोसले फिर्यादीचा झाला आरोपी हे मी जाहीर केले होते. त्यानुसार संजय भोसले यांच्यावर घरफाळा चौकशी समितीच्या दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजीच्या अंतिम अहवालात रू. २,०७,३६,९५१/- ची जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्यामुळे संजय भोसले यांचे या घरफाळा घोटाळयात त्यांच्यावर आयुक्त बडतर्फीची कारवाई करून लवकरच फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार आहे. त्यामुळे मी जे म्हणालो होतो फिर्यादीचा झाला आरोपी हे लवकरच सिध्द होणार आहे.

संजय भोसले या भ्रष्टाचारी व्यक्तीविरूध्दचा लढा मी शेवटपर्यंत सुरू ठेवणार आहे. त्यांना बडतर्फ करून  बेडया घातल्याशिवाय माझा लढा थांबणार नाही, असेही शेटे यांनी म्हटले आहे.