सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे कृषी मंडल कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दुधगंगेच्या काठावरील ३८ गावांना याचा लाभ होणार आहे. कृषी कार्यालयीन कामासाठी राधानगरी येथे नागरिकांना जावे लागत होते. मात्र, या कार्यालयाला मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.

राधानगरी येथे तालुका कृषी कार्यालय आहे. येथेच राधानगरी आणि दुधगंगा काठावरील गावांच्यासाठी हे मंडळ कार्यालय कार्यान्वित आहे. पण या विभागातील ३८ गावातील नागरिकांना शेती विषयक कृषी विभागाच्या योजनांच्या माहितीसाठी राधानगरी येथे जावे लागत होते. शेतकऱ्यांच्या होणारा त्रास वाचावा आणि योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी माजी पं.स. सदस्य आर. के. मोरे यांनी ७ जुलै २०२० रोजी तसेच १ जून २०२१ रोजी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे यासंबंधी पाठपुरावा सुरू केला होता. तसेच या कार्यालयासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता ग्रामपंचायतीकडून करून दिली जाईल अशा ठरावही देण्यात आला होता.

अखेर याला यश येत ४ जुलै रोजी राधानगरी येथील या कार्यालयाचे कामकाज सरवडे येथून सुरू करण्यात येईल असा मंजुरी आदेश मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, आज (गुरुवार) ग्रामपंचायत कार्यालयात जागेची पाहाणी करुन लवकरच येथे दप्तर व अन्य साहित्य ठेवले जाणार आहे.