कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलजीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हयात जलजीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून, जिल्हयात एकूण १ हजार ५३४ योजनांचा ९२१ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर, नलसे जल’ या घोषवाक्यानुसार या प्रकल्पांतर्गत २०२४ पर्यंत प्रति व्यक्ती प्रति दिन ५५ लिटर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन राबविणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आराखडयानुसार एकूण १३०५ योजनांची अंदाजपत्रके तयार केली असून, ९३९ योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच ६०९ योजनांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, उर्वरित योजनांच्या निविदा प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सद्यस्थितीस जिल्हयातील ६ लाख ८८ हजार ४३४ कुटुंबापैकी आज अखेर ५ लाख ३१  हजार ०६८ इतक्या कुटुंबांना कार्यात्मक नळजोडणी देण्यात आलेली असून, ग्रामपंचायतमार्फत नळजोडणीचे काम प्रगतीपथावर आहेत. जिल्हयातील सर्व शाळा व अंगणवाडय़ांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच प्रस्तावित योजना व प्रगतीपथावरील योजना कार्यान्वित झाल्यानंतर उर्वरित ठिकाणी नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत अतिदुर्गम भागातील लोकांनाही टंचाई काळात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेअंतर्गत एकूण ८९ वाडया वस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.