‘समृद्धी’ महिला सक्षमीकरण अभियान राबविणार : ना. हसन मुश्रीफ

0
107

कागल (प्रतिनिधी) : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच महिला अबला नाहीत, त्या सबला आहेत. यापुढे त्यांना अजून सक्षम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

कागल पंचायत समितीच्या आवारात महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खा. संजय मंडलिक यांच्या करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्यांचे वाटप आणि महिला बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

ना. मुश्रीफ म्हणाले की,  समाजात विकास करण्यासाठी महिलाही हक्कदार आहेत. या जाणिवेतूनच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

खा. संजय मंडलिक म्हणाले की,  राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागलचे विकासाचे विद्यापीठ म्हणून ओळख व्हावी. एवढे सुंदर चित्र निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक क्रांतिकारक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. ग्रामविकासाच्या विभागाच्या अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हाती घेतलेली महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानही महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा बॅंकचे संचालक भैय्या माने, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रवी शिवदास, जि.प. सदस्य मनोज फराकटे, उपसभापती अंजना सुतार, पं.स. सदस्य रमेश तोडकर, विजय भोसले, जयदीप पोवार, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर आदी उपस्थित होते.