कागलमधील छ. संभाजीराजे यांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल : ना. हसन मुश्रीफ

0
35

कागल (प्रतिनिधी) : कागलमधील छ. संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ते पुतळ्याच्या निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी, विधायक कार्यासाठी सर्वच राजकीय नेते एकत्र आल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सकल मराठा समाजाच्यावतीने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला जाणार आहे. यावेळी ना. मुश्रीफ यांनी आपली स्वतःची वर्गणी म्हणून पाच लाखांचा निधी  पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

ना. मुश्रीफ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने वडू येथे छ. संभाजीराजे यांच्या स्मारकासाठी ५००  कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. संभाजीराजेंचा चुकीचा इतिहास सांगितला जात असताना,  त्यांचे खरे जीवनचरित्र समाजापुढे येण्यासाठी प्रयत्न करूया. कागल ही छ. शाहू महाराजांची पुण्यभूमी असून इथूनच त्यांनी जगाला समतेचा विचार दिला. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह बसवेश्वर यांचाही पुतळा शहरात आहे. गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे.

तसेच छ. शाहू महाराजांचा शाहू उद्यानातील पुतळा खर्डेकर चौकात न्यावा व तेथील बॅरिस्टर खर्डेकर यांचा पुतळा एका बाजूला बसवावा.  बसस्थानक परिसरातील श्रीमंत बाळ महाराजांचा पुतळा जयसिंगराव पार्कात नेवून त्याठिकाणी स्व. विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा बसवावा.  श्रमिक किंवा शाहू गृहनिर्माण सोसायटी अथवा ठाकरे चौकामध्ये  स्व. खा. सदाशिवराव मंडलिक यांचा पुतळा बसावावा, याबाबत त्यांच्या कुटुंबियांना विचारणाही केली असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, चांगल्या विधायक कार्यासाठी कागलमध्ये सर्वच राजकीय नेते एकत्र येतात, ही कौतुकास्पद बाब आहे. छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी गोळा करून तो लोकोत्सव साजरा करूया. कारण, हा पुतळा बारा बलुतेदार व अठरापगड जातींचा असणार आहे. सामाजिक कार्यासाठी सगळेजण गट पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी पोलीस पाटील शिवगोंडा पाटील, चंद्रकांत गवळी, रमेश माळी, बॉबी माने, रमेश माळी, बाबगोंडा पाटील, विवेक लोटे, सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष विशाल पाटील, नितीन काळबर, नाना बरकाळे, आनंदराव पसारे आदी उपस्थित होते.