अहमदनगर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावरून भाजपचे खासदार संभाजीराजे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद धुमसू लागलाय. संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहेत, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे. तर मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. संभाजीराजे यांनी आज (शनिवार) कोपर्डी इथं जाऊन निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पत्रकारांकडे संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाने राज्यात अभूतपूर्व ५८ मोर्चे काढले. याची दखल संपूर्ण देशाने घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा अशी विनंती केली. मागील ४ वर्षे खटला न्यायालयात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, स्पेशल बेंच तयार करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली.

‘मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे लोकांना मी वेठीस धरू शकत नाही. २००७ पासून मी मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी आहे. हे कधी आंदोलनात आले हे मला माहिती नाही. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. जर देवेंद्र फडणवीस यांनी काही सल्ला दिला तर मी त्यावेळी बोलेन. सकाळपासून चंद्रकांतदादांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे. त्यांच्या मनात असं का येतंय हे मला माहिती नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांतदादांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंना लक्ष्य केले. संभाजीराजे यांनी मोर्चाची घोषणा केली होती. हे प्रसारमाध्यमांनी दाखवलं, वृत्तपत्रात आलं आहे. जर हे खोटं असेल तर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांवर खटला दाखल करावा. त्यांना वकील लागले तर मी देण्यास तयार संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहे, अशी आठवणच त्यांनी करून दिलीय.