कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास सरकार कटीबद्ध आहे. यावर चर्चा करून तोडगा निघू शकतो, त्यामुळे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्या मुंबईला यावे, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेतील. असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी या आंदोलनात सांगितले.

ना. सतेज पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून समितीची स्थापना केली आहे. तसेच केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. पालकमंत्री म्हणून माझे जाहीर निमंत्रण आहे की, उद्या खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत यावे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट देतील. आपण आणि सरकारमध्ये चर्चा व्हावी.

मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्यात समन्वय साधण्याची जबाबदारी खा. संभाजीराजेंनी घ्यावी. तसेच संभाजीराजेंनी मांडलेल्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे ना. सतेज पाटील यांनी सांगितले.