कळे (प्रतिनिधी) : केवळ सामाजिक कार्याचा गवगवा करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकांचा  खटाटोप चाललेला असतो; परंतु आपण करत असलेल्या सामाजिक कार्याचा कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता निरपेक्ष भावनेने सातत्याने सामाजिक कार्य  करणारे काही अवलिया आजही कार्यरत आहेत. असाच एक अवलिया म्हणजेच कळे विद्यामंदिरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. व्ही. अष्टेकर प्रेरित मरळी (ता. पन्हाळा) येथील श्री समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिव संभाजी दांगट यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

कळे ( ता.पन्हाळा ) परिसरामध्ये अनंत श्रीधर कुलकर्णी ही निराधार वृद्ध व्यक्ती स्क्रॅप गोळा करून कसाबसा आपला उदरनिर्वाह करत आहे.  अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये ते सध्या राहत आहेत. कळे दस्तुरी परिसरामध्ये कोल्हापूर-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गालगत  एका आडोशाला स्क्रॅपचे मटेरियल ठेवून तिथेच आपला मोडका-तोडका संसार मांडला आहे. भर पावसात हा माणूस तिथेच राहत आहे. पुराचे पाणी अगदी त्या ओसरीला लागले आहे. तथापि तरीही ते तेथून सुरक्षितस्थळी जाण्यास तयार नाहीत.

दांगट यांनी ही परिस्थिती पाहून त्या ठिकाणी जाऊन या वृद्धाला, ‘अहो तुमच्यासाठी तीन महिन्यापूर्वीच एक खोली मी घेऊन ठेवलेली असून, तुम्ही तिकडे राहायला चला. तुमच्या जेवणाखाण्याचीही व्यवस्था केलेली आहे. येथे आता तुम्ही राहता त्या पाठीमागील बाजूस पुराचे पाणी आले आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, काही काळजी करू नका’ अशी आग्रहाची विनंती करून स्थलांतर होण्यासाठी वारंवार सांगितले.

श्री समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दांगट हे नेहमीच विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत.  ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे आपल्या कृतीतून दाखविणाऱ्या व निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या कृतिशील अवलिया संभाजी दांगट यांचा आदर्श सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतल्यास नवसमाज निर्मिती होण्यास निश्चितच मदत होईल, अशी प्रतिक्रिया सामन्यांतून व्यक्त होत आहे.