कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात होणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार २६ जून रोजी सकाळी ८.३० ते १० या वेळेत दसरा चौकात समता दिंडी आयोजित करण्यात आली असून, यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

समता दिंडीची सुरुवात दसरा चौकात होऊन व्हिनस कॉर्नर- माई महाराजांचा पुतळा- बिंदू चौक-भवानी मंडप – शिवाजी महाराज चौक-सीपीआर रुग्णालय मार्गे दसरा चौक येथे या दिंडीचा समारोप होणार आहे. रविवारी दसरा चौकात सकाळी ७.३० ते ८.३० वाजता शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

सकाळी ८ वाजता राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर ८.३० वाजता दसरा चौक येथे पालकमंत्री सतेज पाटील व श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होऊन समता दिंडीस सुरुवात होणार आहे. या समता दिंडीमध्ये मैदानी खेळ, लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशा असणार असून, एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत पारंपरिक वेषभूषा परिधान करुन जिवंत देख्याव्याचा चित्ररथ, सजवलेल्या रिक्षा, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो व इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेषभूषा करुन या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी समता दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.