समरजितसिंह घाटगे बुधवारी बसणार उपोषणाला

0
58

कागल (प्रतिनिधी): येथील शाहू ग्रुपचे अध्यक्ष, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता येथील ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषणास बसणार आहेत. सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते उपोषण करणार आहेत.
सकाळी करवीर निवासिनी श्री. अंबाबाईचे दर्शन सरकारला सुबुद्धी दे ! असे ते साकडे घालतील. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून उपोषणाला ते सुरुवात करतील. लॉकडाऊन काळातील वीज विल माफ करावे, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान द्यावे, दोन लाखांवरील कर्जमाफी करावी, शेती पंपाच्या वीज बिल माफीबाबत स्पष्टता व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना वाढीव मदत द्यावी या मागण्यांकडे ते लक्ष वेधतील.
त्यांच्या या भूमिकेसाठी जिल्ह्यातून विविध संस्था संघटनांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. राजघराण्यातील व्यक्ती जनतेच्या मागण्यांसाठी उपोषणास बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे त्यांच्या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.