कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या पुढील पाच वर्षाच्या विकासात्मक वाटचालीचे नियोजन तयार आहे. आता कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते आज (बुधवार) कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगाम समाप्ती व उच्चांकी ऊस गळीत उद्दिष्टपूर्ती समारंभावेळी बोलत होते.

शाहू कारखान्याने या हंगामात १० लाख टन गाळपाचा टप्पा पार केल्याबद्दल घाटगे यांचा कारखाना कर्मचारी संघटना, तोडणी वाहतूक संस्था, कर्मचारी पतसंस्थेसह शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी घाटगे म्हणाले की, या हंगामात १० लाख टन गाळपाचा पार केलेला टप्पा हा कारखान्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. तो पाहण्यासाठी कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे असायला हवे होते. या यशाचे मानकरी कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, कर्मचारी, अधिकारी व पुरवठादार हेच आहेत.          

या वेळी व्यासपीठावर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, श्रीमंत प्रविणसिंहराजे घाटगे, सौ. नंदितादेवी घाटगे, सौ. नवोदिता घाटगे, विरेंद्रसिंहराजे घाटगे, हिंदकेसरी दिनानाथसिंह, उदयबाबा घोरपडे, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

लहू शिंदे, सुनील निकम, ज्ञानदेव पाटील, रंगराव पोवार, विपुल कोळाज, ऋषिकेश लोकरे, शंकर पाटील या तोडणी / वाहतूक कंत्राटदारांचा जास्तीत जास्त ऊस पुरवठा केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नागपूर येथे १९७१ साली झालेल्या स्पर्धेत पै. दिनानाथसिंह यांनी हिंदकेसरी ‘किताब मिळविला त्याला २७ मार्च २०२१ रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘शाहू ग्रुप’च्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला. याच बरोबर महिला कुस्तीगीर सृष्टी भोसले, सोनल सावंत, कराटेपटू संस्कार पाटील, ओम दावणे या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.

व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक तर संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले. 

दृष्टीक्षेपात गळीत हंगाम २०२०-२१

एकूण गाळप – १० लाख १७ हजार मे. टन

एकूण साखर उत्पादन – १२ लाख क्विंटल

इथेनॉल निर्मिती – ६५ लाख लिटर्स अधिक

सी,  हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती – २० लाख लिटर्स.

डिस्टिलरी उत्पादन – ८४ लाख लिटर्स

आजपर्यंतची वीज निर्मिती – ६.५० कोटी युनिट

एकूण साखर निर्यात कोटा – ३ लाख २५ हजार क्विंटल

पैकी कारखान्याचा कोटा – १ लाख ८५ हजार क्विंटल

इतर कारखान्यांकडील घेतलेला निर्यात कोटा – १ लाख ४० हजार क्विंटल