मुरगूड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वी प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी केव्हा करणार, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बिनव्याजी कर्जाची योजना खरं म्हणजे यापूर्वीचीच आहे. मात्र सरकार  स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर परत तीच घोषणा करणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा  प्रकार आहे. तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाची घोषणा शासनाने केलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही. यामुळे अशा घोषणा करून राज्य सरकार शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. यापूर्वी त्यांनी म. फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचेही जाहीर केले होते. हे अनुदान त्वरीत द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत…

राज्य शासनाने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे २ लाख १७ हजारांंहून अधिक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर प्रामाणिकपणे कर्ज भरणे ही आमची चूक आहे का, असा सवाल करीत सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.