पन्हाळा (प्रतिनिधी) :  यावर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे पन्हाळ्याचे मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजा येथील मुख्य रस्ता खचला आहे. याची  पाहणी करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे यांनी आज (बुधवार) भेट दिली. यावेळी त्यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी करून त्यावर चर्चा केली. तसेच या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, असे निवेदन त्यांना देण्यात आले.

यावेळी गेली काही वर्षे अतिवृष्टीने या भागात भूस्सखलन होत आहे. त्यामुळे बुधवार पेठ पन्हाळा हा रस्ता खचत जात आहे. त्यामुळे येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत होत चालले आहे. या वर्षीच्या पावसात देखील हा रस्ता खचलेला आहे. त्यामुळे शहरातील लोकांचा संपर्क तुटला आहे. शिवाय तालुक्याचाही संपर्क तुटल्यामुळे शासकीय कामकाजाची कामे ठप्प झाली आहे. पन्हाळा हे पर्यटनस्थळ असल्यामुळे इथल्या व्यवसायिकांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पन्हाळगडाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे मागणीचे निवेदन समरजितसिंह घाटगे यांना देण्यात आले.

यावेळी पन्हाळा तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे, पन्हाळा शहराध्यक्ष अमरसिंह भोसले, जिल्हा चिटणीस युवा मोर्चा माधवी भोसले, तालुका उपाध्यक्ष इंद्रायणी आडनाईक, संध्या गवळी, आशिकी राऊत, पृथ्वीराज भोसले, अनुप गवंडी, मनोज नाखरे आदी उपस्थित होते.