टिपर कर्मचाऱ्यांचा पगार जमा, ‘आप’च्या शिष्टाईला यश

0
34

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील कचरा उठाव करण्याचे काम करणाऱ्या टिपर कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्याने कचरा उठाव पूर्ववत सुरू झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी शिष्टाईला यश आले आहे.

कचरा उठाव करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करणाऱ्या टिपर चालकांचा मे महिन्याचा पगार न झाल्याने चालकांनी काम बंद केले होते. या चालकांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवावा, अशी विनंती केली होती.

कसबा बावडा येथील डंपिंग साईटवर बैठक घेऊन टिपर चालकांचे पगार व्हावेत, यासाठी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी डी. एम. कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून पगार त्वरित करावेत, अशी मागणी केली. सर्व चालकांचे पगार होतील, असे आश्वासन कंपनीने दिल्यानंतर दुपारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार जमा झाले. त्यानंतर कचरा उठाव पूर्ववत सुरू झाले.

कर्मचाऱ्यांचे पी.एफ, इएसआयसी, पगार स्लिप आणि अवाजवी पगार कपात या मुद्यांवर ‘आप’ शिष्टमंडळाची डी. एम. एंटरप्राइजेसच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पी.एफ, इ.एस.आय.सी संबंधित सर्व त्रुटी दूर करू, पगार १५  ते २० तारखेपर्यंत जमा करू, पगार कपातीचा नियमांवर ढिलाई देऊ, असे आश्वासन कंत्राटदाराने दिले. मागण्या मान्य झाल्याबद्दल टिपर चालकांनी संदीप देसाईंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सूरज सुर्वे,  अभिजित कांबळे, आनंदा चौगुले, मयूर भोसले, उत्तम पाटील, विशाल वठारे व टिपरचालक उपस्थित होते.