सैनिक टाकळी येथे लाखोंचा गांजा जप्त : एकाला अटक

0
920

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीच्या हद्दीत उसाच्या शेतात एका शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर शेतामध्ये ऊसाबरोबर गांजा लावल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी सदाशिव आप्पासाहेब कोळी (वय ५२) याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४९० गांजाची झाडे, ५ किलो तयार गांजा आणि पुड्या असा लाखों रुपयाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी सदाशिव कोळी याच्या घरावर छापा टाकला असता विक्री करण्याच्या उद्देशाने सुका तयार गांजाच्या कागदाच्या पुड्या आणि ५ किलो सुका गांजा घराच्या आडोश्याला मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून पोलिसांनी याबाबत कसून चौकशी सुरू केली आहे.

सैनिक टाकळी हद्दीतील शेती गट क्र. १००५ मध्ये गांजाची शेती असल्याची माहिती सपोनि बालाजी भांगे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सपोनि भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, किशोर खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली फारुख जामदार शहाजी फोंडे, प्रकाश हंकारे, शिरीष कांबळे, नागरगोजे, अरुण वठारे, सचिन पुजारी, चंद्रकांत मोरे, श्रीमती सुप्रिया जगदाळे यांच्या पथकाने आज सायंकाळच्या सुमारास संबंधित शेतीवर धाड टाकून सदाशिव कोळी याला ताब्यात घेतले.