कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या ‘मध्यरात्री नंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला. सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. त्यांच्या जाँयस्टिक या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह,  ५० हजार रुपये रोख आणि मानपत्र असे आहे.  

सोनाली यांनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केलं असून त्या स्वतंत्र लिखाण ही करतात. तर जयश्री शानभाग यांनी कोकणीत अनुवादित केलेल्या ‘स्वप्न सारस्वत’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. सोनाली प्रकाश नवांगुळ यांचे मूळ गाव बत्तीस शिराळा आहे. वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झाल्या. सोनालीने घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर २००० साली सोनाली कोल्हापुरात येवून हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन सोनाली संस्थेतून बाहेर पडल्या.

त्यांनी स्पर्शज्ञान या मराठी या पहिल्या मराठी नोंदणीकृत भरलेलं पाक्षिकाची उपसंपादक म्हणून काम स्वीकारले. आजही त्या अंधांसाठीच्या मराठी आणि हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीचे लेखन करतात. तसेच विविध वृत्तपत्रांसाठीही सदर लेखन व प्रासंगिक लेखनकेले आहे. याखेरीज  आजवर त्यांची ड्रिमरनर, मध्यरात्रीनंतरचे तास,  वारसा प्रेमाचा वरदान रागाचे ही अनुवादित पुस्तके, लहान मुलांसाठी जॉयस्टिक ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नर्मदा बचाव आंदोलनाच्या लढाऊ कार्यकर्त्या मेधा पाटकर या लेखनाचे पुस्तक ‘स्वच्छंद’ प्रकाशित झाले आहे.