कडगाव (प्रतिनिधी) : शिवाज्ञा प्रतिष्ठान भुदरगडच्या मावळ्यांनी जवळजवळ तीनशे वर्षे अपरिचित असलेल्या नारायण गडावर भगवा ध्वज फडकावून या वनदुर्गाला प्रथम सलामी दिली.

शिवकालात दुर्ग व डोंगरी किल्ल्याप्रमाणे वनदुर्ग किल्ल्यांना अनन्य साधारण असे महत्त्व होते. या वनदुर्ग किल्ल्यावरुन मराठ्यांना टेहळणी करणे व शेजारच्या गडावर आवश्यक वार्ता कळविणे, त्याचप्रमाणे घाटमार्गांवर वचक ठेवण्याकरिता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर किल्ल्याची निर्मिती केली. त्यापैकी सावंतवाडी संस्थानाच्या अण्णासाहेब फोंड सावंतानी आंबोलीजवळील पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसुलीचे ठिकाण म्हणून या वनदुर्ग किल्ल्याची सतराव्या शतकामध्ये निर्मिती केली; मात्र ब्रिटिश सत्तेने सतराव्या शतकात देशातील सर्व संस्थाने व १८४४ मध्ये तोफांच्या माऱ्याने सर्व गड खालसा करुन सत्ता निर्माण केली.

पुढे अनेक वनदुर्गांना उतरती कळा लागल्यानंतर या किल्ल्याचे वैभव कमी झाले. भौगोलिक दृष्ट्या घाटमाथ्याला समांतर असणारा हा किल्ला आंबोलीजवळील गेळे या गावापासून सहा ते सात कि.मी. घनदाट जंगलात सह्याद्रीच्या घाट माथ्यावर ताठ मानेने उभ्या असणाऱ्या या किल्ल्यावरील भग्नावशेष एकत्र करुन त्यांचे संवर्धन केले. गडावर साफसफाई, पूर्वेकडील बुरूज खुला करून त्यावर स्वराज्याचे भगवे निशाण फडकवले. पाऊस, दाट धुके, चिखल तुडवत, झाडाझुडपातून मार्ग काढत हे मावळे गडाकडील प्रवास सुरू करुन अंगाखांद्यावर सिमेंट, वाळू खडी, ध्वजाची पाईप, पहार, सळी, लोखंडी बार हे सर्व ओझे डोक्यावर घेऊन आणि प्रचंड रक्त पिणाऱ्या कानिटापासून संरक्षण, अनेक अडचणींचा सामना करत, छत्रपती शिवाजी महाराजाच्या अपार श्रद्धेपोटी सर्वांनी ही मोहीम फत्ते केली.

शेकडो वर्षांनंतर नारायण गडावर भगवा ध्वज फडकवून जणु सह्याद्रीलाच मानवंदना दिली. यावेळी शिवाज्ञा परिवाराचे ३५ ते ४० कार्यकर्ते व गेळे गावामधील ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाज्ञाच्या या जिगरबाज मावळ्यांनी गडसंवर्धनाच्या अनेक धाडसी मोहिमा केल्या आहेत; पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नारायण गडावरील भगवा ध्वज फडकवलेल्या या मोहिमेचे कौतुक होत आहे.