ठाणे (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची सरकारने बदली केली. बदलीनंतर आज (शनिवार) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार. मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे. मला वाटतं, जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय, असे व्हॉट्सअप स्टेटस वाझे यांनी ठेवल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरील भाजपाने विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होतं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजपाकडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. अखेर वाझे यांची आज बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आल्यानंतर वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटले आहे की, तीन मार्च २००४. सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे. आधी हे घडलं तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होतं, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्ष शिल्लक होती. मात्र आता माझ्याकडे आयुष्याची पुढील १७ वर्षे शिल्लक नाहीयेत. तसेच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचं धैर्यही नाहीय. मला वाटतं, जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय.