सचिन वाझे यांची बदली करणार : गृहमंत्री अनिल देशमुख  

0
11

मुंबई (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी विरोधकांनी आरोप केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत आज (बुधवार) केली.    सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली.

विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे, अशी विचारणा केली. यावर अनिल देशमुख यांनी सांगितले की,  सचिन वाझे यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.  परंतु विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत वाझे यांना निलंबित करून अटक कऱण्याची मागणी विधान  परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.