सचिन वाझे प्रकरण : अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

0
152

 मुंबई (प्रतिनिधी) : कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवार) आपली भूमिका स्पष्ट केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. याबाबत अजित पवार यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं महाविकासआघाडी सरकारचं काही कराण नाही. आणि सरकार तसं अजिबात करणार नाही. हे मी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने स्पष्ट करू इच्छितो. एनआयए व एटीएस या दोन्ही तपास यंत्रणा आता चौकशी करत आहेत. त्यामुळे ज्या काही घटना समोर येत आहेत, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल, हे मी स्पष्टपणे सांगतो.