कागल (प्रतिनिधी) : काहीही झाले तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. सुळकूड (ता. कागल) येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसह पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पूरग्रस्तांच्या प्रत्येक अडचणीच्या सोडवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकार बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुश्रीफ यांनी सांगितले की, प्रशासनाला मी याआधीच सूचना दिलेल्या आहेत.  मातीच्या घराची एक भिंत जरी पडलेली असेल तर पंचनाम्यामध्ये त्याचा अंशता, किरकोळ असा शब्दांचा खेळ न करता ते संपूर्ण घरच पडले, असा करा. कारण; मातीच्या घराची एक जरी भिंत पडली तरी संपूर्ण घरच नंतर ढासळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महापुरामुळे होणाऱ्या विस्थापितांच्या समस्येवर कायमचे पुनर्वसन हाच तोडगा सुचविलेला आहे. पूरबाधित लोकांना आपल्या घरादासह दुसऱ्या सुरक्षित जागेवर स्थलांतरित व्हावंच लागेल. विद्युत खांबांची उंची वाढवून त्याऐवजी टॉवर उभारावे लागतील, त्यासाठी निधीही देऊ. जॅकवेल महापुरात बुडल्यानंतर उंचवट्यावरील भागातील विहिरीतून पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू ठेवावा लागेल.

या वेळी जि. प. सदस्य युवराज पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पो. नि. दत्तात्रय नाळे, बापूसाहेब पाटील, एम. वाय. भिकाप्पा-पाटील, पं. स. सभापती रमेश तोडकर, कृषी अधिकारी भिंगारदिवे, राजेंद्र माने, सरपंच सुप्रिया भोसले, उपसरपंच शरद धुळुगडे, आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे, जलसंपदा विभागाच्या भाग्यश्री पाटील, तलाठी अनिता कोळी, दादासो चवई, कलगोंडा पर्वते आदी उपस्थित होते.