कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे- बंगळूर महामार्गावरील किणी (ता.हातकणंगले) पथकर नाक्यावर फास्टॅगमुळे वाहनांची गर्दी झाल्याने पुण्याच्या माजी नगरसेवक व मनसेच्या कार्यकर्त्यां रुपाली पाटील यांनी मंगळवारी रात्री काही वेळ टोल फ्री केला. सोमवारपासून फास्टॅगची सक्ती केली. ज्या वाहनांवर फास्टॅग नाही. त्यांच्याकडून दुप्पट पैसे घेतल्याने वाद झाले आणि त्यातूनच वाहनांच्या रांगा लागल्या. मनसेच्या कार्यकर्त्यां रुपाली पाटील या कोल्हापूरला गेल्या होत्या. रात्री परताना वाहनांची गर्दी झाल्याचे निदर्शनास आले.

 

 

किणी टोलवरील फास्टॅगच्या माध्यमातून सुरु असलेली लोकांची पिळवणूक थांबवा. नियमानुसार तीन मिनिटात वाहने जात नसल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. ७ किलोमीटरवर रांगा लागल्या आहेत. लोकांना सुविधा द्यायला आहात का मारायला ? फास्टॅग नाही म्हणून डबल पैसे का द्यायचे? डबल पैसे देणार नाही. पहिल्या रांगा बंद करा. फास्टॅग करून वेळ वाचतच नाही. फास्टॅग बंद करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा अ‍ॅड. पाटील यांनी देत काही वेळ वाहने फ्री सोडण्यास भाग पाडले. नियोजन चांगले केले आहे. फास्टॅगमुळे वाहने पंधरा सेंकदात जातात. पण ज्या वाहनांवर फास्टॅग नाही. त्यांच्यामुळे वाहनांना उशीर होत आहे. त्यामुळे रांगा लागतात, असे टोल व्यवस्थापक प्रताप भोईटे यांनी सांगत अ‍ॅड. पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही पाटील यांनी काही वेळ टोल फ्री करण्यास भाग पाडलेच.