कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान आणण्यासाठी कार्यरत असलेल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने तळसंदे परिसरात रबर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (आरआरआयआय) सहकार्याने विद्यापीठ व नजीकच्या परिसरात रबर रोपांची लागवड केली जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा नवा मार्ग उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व भारत सरकारच्या रबर बोर्डचे कार्यकारी संचालक डॉ. के. एन. राघवन यांनी सांगितले.

केरळ, तामिळनाडू व ईशान्येकडील राज्यामध्ये रबराचे मोठ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. महाराष्ट्रातही सिंधुदुर्गच्या काही भागात रबर लागवड करण्यात आली आहे. आता कोल्हापूर विभागात रबर लागवडीचा प्रयोग केला जात आहे. त्यासाठी डी. वय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, कोट्टायम येथील रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत रबर लागवडीबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

रबर बोर्डाचे कार्यकारी संचालक डॉ. के. एन. राघवन आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. जेसी एम.डी. व कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही संस्थांमधील हा करार पाच वर्षांसाठी आहे. विद्यापीठ परिसरात लागवड केल्या जाणाऱ्या रबर रोपासाठीचे सर्व तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य ‘आरआरआयआय’ करणार आहे.

यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, फार्म हेड ए. बी. गाताडे, पी. एस. पाटील, डॉ. बाबासाहेब उलपे आदी उपस्थित होते. डॉ. के. एन. राघवन, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. जेसी एम.डी. व मान्यवरांच्या हस्ते रबरच्या रोपांची लागवड करण्यात आली. कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी रबर लागवड प्रकल्पाची माहिती दिली.

कोल्हापुरात रबर लागवड यशस्वी झाल्यास शेतकर्‍यांना तर फायदा होईल. त्याचबरोबर अनेक प्रक्रिया उद्योगही उभे राहतील, असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. तळसंदेचा परिसर येथील वातावरण रबर लागवडीसाठी पोषक आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येईल, असे डॉ. राघवन यांनी सांगितले.