अयोध्या (वृत्त्संस्था) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनुभव राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे. ‘देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत. रबर स्टॅम्प तर अनेक रांगेत आहेत. राष्ट्रपतीपद कुणाला द्यायचे हे राज्यकर्त्यांवर अवलंबून आहे. देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, उत्तम प्रशासक हवा असेल, तर सरकारने राष्ट्रपती निवडावा. रबर स्टॅम्प निवडू नये, असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

शरद पवार देशातील प्रमुख नेते आहेत. सगळ्यात अनुभवी नेते आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये गेली ५० वर्ष अजिंक्य असलेले नेते आहेत. राज्यकर्त्यांचे मन मोठे असेल तर ते राष्ट्रपती निवडतील, नाहीतर खुजे लोक निवडतीलच; पण अर्थात शरद पवार यांनी या सर्वाला मान्यता दिली तर या गोष्टी शक्य आहेत,  असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत अयोध्येत तयारीची पाहणी करत आहेत.

दरम्यान, मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या सरकारी मेगा भरतीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मेगा भरतीच्या निर्णयाचे स्वागत करतो असं राऊत यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यावर दोन कोटी रोजगार देण्याची हमी दिली होती. त्यानंतर भाजपने पाच कोटी रोजगार देण्याचा दावा केला, मात्र पूर्ण केला नाही. आता मोदी यांनी दिलेले वचन पाळण्याची गरज आहे’, असे राऊत म्हणाले.