‘आरटीओ’ ऑफिस ३० एप्रिलपर्यंत बंद : डॉ. स्टीव्हन अल्वारिस

0
320

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १५ ते ३० एप्रिल पर्यंतच्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर व वाढत्या कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी आरटीओ ऑफिसचे कामकाज व तालुका शिबिर ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

आरटीओ ऑफिसची सेवा अत्यावश्यक सेवा नसल्यामुळे जनतेला आवाहन आहे की, त्यांनी आपला व आपल्या प्रियजनांचा जीव सांभाळावा. कार्यालय सुरु झाल्यानंतर आपली कामे करून घेता येतील, होणारे नुकसान भरून काढता येणार नाही. कच्चे व पक्के लायसन्स, वाहन नोंदणी वाहन, हस्तांतरण व इतर अनुषंगिक कामे, परवाना विषयक कामे सर्व बंद ठेवण्यात येत आहेत. अंमलबजावणी पथकाचे काम चालू राहणार आहे. वाहन अधिग्रहण, वाहनांची तपासणी, रस्ता सुरक्षा विषयक कामकाज, सार्वजनिक व खाजगी वाहनांची तपासणी यासाठी या पथकांचे कामकाज चालू राहणार आहे.

यापू्र्वी शेवटच्या टप्प्यात असणारी कामे,  अत्यावश्यक सेवेसाठीच्या वाहनासंबंधी कामे, व्यक्तीचा थेट संबंध न येणारी कामे फक्त अशीच कामे केली जातील.  शासनाने घालून दिलेल्या कोरोना संबंधी नियमांचे पालन करा, काम नसताना घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा, असे आवाहनही डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे.