कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोकण व गोव्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या आजरा – आंबोली मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पर्यटन, व्यापारासह उद्योगधंद्याच्या वाढीकरिता चालना मिळावी व वाहतूक खर्चासह वेळेची बचत व्हावी यासाठी खा. संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे संकेश्वर ते बांदा दरम्यानच्या १०८ किमी रस्त्याच्या दुहेरीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार संकेश्वर ते आंबोली फाटा दरम्यानच्या ६१ किमी रस्त्याकरिता ५७४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती खा. संजय मंडलिक यांनी दिली.

या संदर्भात खा. मंडलिक यांनी सांगितले की, गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. गोवा आणि कोकणात जावयाचे झाल्यास आजरा – आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. सध्या या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून या रस्त्याला महामार्गाला दर्जा देऊन दुहेरीकरण व्हावे अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांचेकडे केली होती. या महामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरुन इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.

त्यानुसार, गडकरी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून संकेश्वर – गडहिंग्लज – कोवाडे – आजरा – गवसे – आंबोली दरम्यानच्या या ६१ किमी रस्त्याकरिता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीकरिता ५७४ कोटी रु. मंजूर केले. आंबोली ते बांदा दरम्यानच्या रस्त्याकरिता आवश्यक असणारा निधी पुढील आर्थिक वर्षात मंजूर होणार असल्याची माहितीही खा. मंडलिक यांनी पुढे दिली.