नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ डिसेंबर रोजी वर्षातील तिसरा २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. ते आज (शुक्रवार) मध्य प्रदेशमधील किसान महासंमेलनात बोलत होते.

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपयांचे हप्ते पाठवले जातात. पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित करते. पहिला हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान, तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान आणि तिसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. खात्यावर पैसे जमा होण्यास पात्र आहे किंवा नाही हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) पाहता येणार आहे. यात तुम्हाला शेतकरी कॉर्नर टॅब क्लिक करावे लागणार आहे.