कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सवानिमित्त पंचगंगा नदी घाट असंख्य करवीरवासीयांच्या उपस्थितीत दिव्यांनी उजळून निघाला. नदी घाटावर अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या अनेक संस्था, संघटना यांच्याकडून साकारण्यात आल्या.

यावेळी लक्ष वेधून घेतले ते रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्यांनी साकारलेल्या थुंकीमुक्त कोल्हापूर या संदेशाच्या रांगोळीने. कोल्हापुरात अजूनही ठिकठिकाणी लोक मावा खाणे, तंबाखू खाणे आणि जागोजागी त्यांच्या पिचकाऱ्या मारणे असले उद्योग लोक करतात. ज्यामुळे रस्ते, ऐतिहासिक वास्तू, इमारती तर खराब होतात; पण सार्वजनिक आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होतो म्हणूनच सर्वच कोल्हापूरकरांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून, यासाठीच हा संदेश दिल्याचे क्लबच्या सदस्यांनी सांगितले. अनेक करवीरवासीयांनी या रांगोळीसह सेल्फी आणि फोटो घेऊन ते सोशल मीडियावर शेयर केले. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरचे रोट्रॅक्ट मूव्हमेंट इन कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते.