रोहित शर्माचे शतक : डॉन ब्रॅडमननंतर पटकावले दुसरे स्थान

0
287

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नई येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने १३० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर दमदार शतक ठोकून टीकाकारांचे तोंड बंद केले. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरे स्थान पटकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत. तर  वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली ७७.६च्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर एकीकडे तीन विकेट पडल्यानंतर रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवे कसोटी शतक झळकावले. चेन्नईच्या मैदानावरील हे त्याचे पहिलेच शतक तर कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. खेळाची सुरूवात शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केली. गिल शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने मात्र दमदार खेळ सुरू ठेवला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करत त्याने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात तंबूत परतले. पण अजिंक्य रहाणेच्या मदतीने रोहितने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर सारी सूत्रे आपल्याकडे घेत  रोहित शर्माने दमदार शतक ठोकले.