‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’: रोहित पवारांचा भाजप नेत्यांना टोला

0
108

मुंबई (प्रतिनिधी) : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामागील गणित मांडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केंद्र सरकार चलाखी करत असल्याचा आरोप करून राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’ असा टोला लगावला आहे.  

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारची चलाखी बघायची असेल, तर याचं एक ताजं उदाहरण बघता येईल. बजेटमध्ये केंद्राने २.५ रु प्रती लिटर कृषि सेस लावला आणि २.५ रु एक्साइज ड्युटी कमी केली. त्यात बेसिक एक्साइज ड्युटीमध्ये १.५ रुपये, तर स्पेशल एक्साइज ड्युटीमध्ये १ रुपया कमी केला. पण यात महत्वाचं म्हणजे राज्यांना केवळ बेसिक एक्साइज ड्युटीमध्येच वाटा मिळतो आणि केंद्राने नेमकी त्यातच कपात केली. म्हणजे ग्राहकांसाठी किंमती वाढल्या नाहीत, पण पेट्रोल-डिझेलवरील करांच्या माध्यमातून राज्यांना वाटा द्यावा लागू नये आणि आपलेच खिसे भरताना जनतेचे खिसे कसे कापतो हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने ही चाल खेळली. अशा प्रकारे राज्यांचा खिसा कापल्यामुळं केंद्रीय करातील वाट्यापोटी राज्यांना मिळणारी रक्कम घटणार असून, महाराष्ट्राला २०२१-२२ या आर्थिक वर्षात केवळ ४२०४३ कोटी रुपये मिळणार आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.