जळगाव (प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांची रेटारेटी, घोषणाबाजी आणि बेशिस्त वर्तन पाहून कार्यकर्त्यांना चुकवत मागच्या दाराने बाहेर पडण्याची वेळ कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आज (सोमवार) येथे आली. रोहित पवार यांचा जळगावातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रम होता. यावेळी  कार्यकर्त्यांच्या धिंगाण्यामुळे त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

यावेळी कार्यक्रमाचे नियोजन फसल्याचे लक्षात आल्यावर रोहित पवारांनी माइकचा ताबा आपल्याकडे घेत आपल्या भाषणाला सुरूवात केली. पवारांनी अवघ्या पाच मिनिटात आपले भाषण संपवले. ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभर युवा वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे गेली आहेत. यापुढे आपण सर्व जण एकत्र आलो, तर पुढील निवडणुकांमध्ये निश्चितच चित्र बदलेल, असे रोहित पवार म्हणले. परंतु कार्यकर्त्यांचा धिंगाणा सुरूच राहिल्याने भाषण संपल्यावर रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना चुकवत मागच्या दाराने बाहेर पडले. त्यानंतर या कार्यक्रमाची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी सुरूच होती.