कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेल्या महसूल जत्रेतर्गंत सामोपचाराने आणि लोकसहभागातून शेत रस्ते अतिक्रमण मुक्त होत आहेत. उद्या (गुरूवार) एकाच दिवशी भुदरगड तालुक्यातील ५३ गावांतील ६१.९८० तर आजरा तालुक्यामधील ५२ गावातील ६६.७०० किलोमीटर लांबीचे रस्ते खुले करण्यास सुरूवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी स्वत: जेसीबी चालवून मार्गदर्शन केले.

भुदरगड तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील कामत पाणंद अडीच किलोमीटर रस्ता खुला करण्यात आला. पाणंद रस्त्यांचा लाभ भुदरगड तालुक्यातील ३ हजार ३४४ शेतकऱ्यांना तसेच आजरा तालुक्यातील २ हजार ७१५ शेतकऱ्यांना होणार आहे. ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.