इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील महासत्ता चौकामधील रस्ता अरूंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याची दखल घेत इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी नगररचना व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्यासह चौकात येऊन पाहणी केली. तसेच रस्ता रुंदीकरणाबाबत योग्य त्या सूचना करून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. 

राजवाडा चौक ते महासत्ता चौकात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होती. त्यामुळे पादचारी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर  कायम वर्दळ सुरू असल्याने नागरिकांना चालताही येत नाही. सांगली, मिरज येथे जाण्यासाठी या मार्गाचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे   महासत्ता चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते. तसेच अपघात होण्याचे प्रमाणही जास्त आहे. याची दाखल घेत पोवार यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक रविंद्र माने, विजय जगताप, नगररचना शाखा अभियंता बबन खोत, उपनगर अभियंता प्रवीण बैले, कोर्ट विभाग प्रमुख महादेव गोरडे, नागेश शेळके, प्रवीण फगरे, हेमंत कांबळे आदीसह नागरिक उपस्थित होते.