सावरवाडी (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी बीड शेड येथे भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या वतीने  रास्ता रोको आंदोलन आज (गुरुवारी) सकाळी करण्यात आले. 

मुख्य चौकात सकाळी नऊ वाजता आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत रास्ता रोको केला.  या आंदोलनामुळे तासभर करवीर तालुका पश्चिम भागातील ग्रामीण वाहतूक ठप्प झाली होती.

केंद्र शासनाने शेतीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा, कोरोना काळात शेतकरी विरोधी कायदा करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. याबाबत आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी  महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेवराव गावडे,  गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील,  करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी,  दिनकर सुर्यवंशी,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन पाटील  यांची भाषणे झाली.

या आंदोलनात जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सुर्यवंशी, सदाशिव खाडे, ग्राहक चळवळीचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील,  कृष्णात ठाणेकर,  वसंतराव वरुटे, अशोक पाटील,  जयवंत जोगडे, पंडीत राबाडे,  शिवाजी तळेकर आदीसह कार्यकर्ते,  शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.