कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महानगरपालिकेला सर्व शासन अनुदान आणि महानगरपालिका स्व:निधीतून ३८ कोटी ५१ लाखांची रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. ठेकेदारांना कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला आहे. परंतु, परतीचा पाऊस लांबल्यामुळे ही कामे अद्यापही सुरु करता आलेली नाहीत. ही कामे पावसाळा संपल्यानंतर तात्काळ सुरु करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती महापौर निलोफर आजरेकर यांनी दिली.

कोल्हापूर शहरामध्ये मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश रस्ते खराब झालेले आहेत. त्याअनुषंगाने शहरामध्ये खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भाने पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी बैठका घेऊन सुचना दिल्या तसेच शासन स्तरावर निधी उपलब्ध होणे कामी पाठपुरावा केला.

कोल्हापूरच्या महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघडीचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी रस्त्यांच्या संदर्भात संबंधित विभागांची दोन ते तीन बैठका घेऊन शहरातील रस्ते दुरुस्ती व नव्याने रस्ते करणेबाबत वेळोवेळी पाठपुरवा केला होता.