चंदगड (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने शेतकऱ्यांविरुद्ध केलेले अन्यायी कायदे रद्द करावेत. तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पाटणे फाटा येथे आज (मंगळवार) रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी पोलिस प्रशासनाला आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रशासनाने शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. करार, किंमत हमी, शेती सेवा कायदा,  शेतकरी शेती माल कायदा आणि विक्री कायदा, अत्यावश्यक वस्तू या सर्व कायद्यांना शेतकरी, जनतेचा विरोध आहे. यासाठी दिल्लीत प्रदिर्घ काळापासून आंदोलन सुरू आहे. पण सरकारने याबद्दल आज अखेर कोणतेही निर्णय घेतला नाही. या आंदोलनाच्या समर्थनास व केंद्र शासनाच्या निषेधात सर्वस्तरावर आंदोलन होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने ठराविक उद्योगपती व भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी घाईघाईने केलेले कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना न्याय मिळावा यासाठी हा रास्तारोको केल्याचे सरपंच विष्णू गावडे यांनी सांगितले. तर आंदोलनस्थळी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत बेळगाव-वेंगुर्ला रस्ता अडवल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी पोलिस प्रशासनाला आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

यावेळी विलास पाटील, आनंद कांबळे, संदिप सकट, एकनाथ कांबळे, दत्तू मुलीक, शिवाजी तुपारे, जोतिबा गोरल, पिनू पाटील, बाबुराव पाटील, तानाजी गडकरी, मनोज रावराणे, रायमण फर्नांडिस,शेतकरी उपस्थित होते.