इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील प्रभाग क्र. ३० मधील बागडे गल्ली, नवीन वसाहत, कागवाडे मळा, शेळके मळा, जामदार गल्ली येथे आठ दिवसातून एकदा आणि तेही अळ्या असलेले, दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज (गुरुवार) रास्ता रोको केला. यामुळे बराच काळ झेंडा चौक ते नदी पूल आणि चांदणी चौक ते मरगुबाई मंदिरापर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती. 

प्रभाग ३० मधील बागडे गल्ली, नवीन वसाहत, कागवाडे मळा, शेळके मळा, जामदार गल्ली येथे आठ दिवसातून आठ दिवसातून एकदा पाणी सोडले जाते. हेही कमी म्हणून की काय या पाण्यात अळ्या आढळून येत असून पाण्याला दुर्गंधीही सुटल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वारंवार लोकप्रतिनिधींना याबाबत सांगून आणि नगरपालिकेत निवेदने देऊनही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अखेर आज प्रमोद बचाटे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रास्ता रोको केला. यामुळे बराच काळ झेंडा चौक ते नदी पूल आणि चांदणी चौक ते मरगुबाई मंदिरापर्यंतची वाहतूक ठप्प झाली.

पोलिसांनी हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना केली. त्यानंतर पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे आंदोलनस्थळी पोहचले. सुर्वे यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन अभियंता बाजी कांबळे यांना पाईपलाईन बिघाड असेल तर तत्काळ दुरुस्त करून घ्या, अशा सूचना केल्या. आंदोलकांना एक दिवसाआड मुबलक व स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात पृथ्वीराज चव्हाण, राजश्री काळे, शोभाताई चव्हाण, बतुला पठाण, शालन म्हैसाळकर, चंदा आंबी, जयश्री सोनुले, फातिमा मुजावर, परी बागवान, महेश बेडगे, दत्ता काळे, प्रसाद काळे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.