कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील श्रीमती रेखा दुधाणे या महाराष्ट्रातील पहिल्या लायसन्स धारक महिला रिक्षाचालक यांच्या रिक्षातून आज (रविवार) फेरफटका मारला. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला.  दुधाणे यांनी ३० वर्षापूर्वी निवडलेली वेगळी वाट आजही वेगळ्या क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत आ.पाटील यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

गेली ३० वर्षे धैर्याने आणि चिकाटीने रिक्षाचालक म्हणून काम करताना दुधाणे यांनी परिस्थिला खंबीरपणे तोंड दिले. मुलांना शिक्षण दिले, संसाराला आकार तर दिलाच पण लोकांची सेवा करण्याचे व्रत जपले. रात्री अपरात्री पेशंट तसेच अडल्या नडल्या लोकांना त्या रिक्षाची सेवा देतात. बऱ्याच लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे. त्यांचे या सर्वांशी कौटुंबिक नाते निर्माण झाल्याने सर्वजण हक्काने त्यांच्याशी संपर्क करतात.