मुंबई (प्रतिनिधी):  महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. ऋतुराजने या षटकातील चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले, त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल ठरला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय.

ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहने १५ वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने केलीय. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात आज क्वार्टर फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर ३० षटकांत ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले.

महाराष्ट्राकडून ऋतुराजने अवघ्या १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यात १० चौकार आणि १५ षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचे हे मागील आठ डावातील सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. २५  वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे १३ वे शतक आहे.