इचलकरंजी (प्रतिनिधी) : बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा हा राममंदिर निर्माणासाठी निधी संकलन करीत असताना त्याची काही मुस्लिम तरुणांनी दिल्लीत निर्घृण हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने आज (सोमवार) प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आज दुपारी कॉ. के. एल. मलाबादे चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते जमले. त्यांनी रिंकू शर्मा याच्या फोटोचे पूजन आणि श्रध्दांजली वाहून मूक मोर्चाला सुरुवात केली. शहरातून विविध मार्गातून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यावर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथील मंगोलपुरी परिसरातील रिंकू शर्मा हा बजरंग दलाचा कार्यकर्ता आपल्या सहकाऱ्यांसोबत राममंदिरासाठी निधी संकलन करत असताना तेथील मुस्लीम तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करून रिंकू शर्मा याची हत्या केली. या हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, शर्मा यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देवून परिवारास एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, मुस्लिमबहुल क्षेत्रात हिंदू युवकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावीत, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात केला आहे.

या मोर्चामध्ये मोर्चात शिवजी व्यास, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, संतोष मुरदंडे, सनथकुमार दायमा, रमेश खंडेलवाल, संतोष खाडे, जितेंद्र मस्कर, सुनील कांदेकर, मनीष रावळ, अविनाश हुजरे सहभागी झाले होते.